युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेसोबत तडजोड करण्याची भाषा करतानाच अमेरिकेसोबत मिळून रशियासोबत शांतता चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. झेलेन्स्की यांनी सांगितले की, अमेरिका आणि युक्रेन पुढील आठवड्यात सौदी अरबमध्ये चर्चा सुरू करतील. त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर अनेक पोस्टद्वारे ही घोषणा केली.
झेलेन्स्की म्हणाले, “पुढील आठवड्यात, सोमवारी, क्राउन प्रिन्सची भेट घेण्यासाठी माझा सौदी अरब दौऱ्याचा मानस आहे. त्यानंतर, माझी टीम आमच्या अमेरिकन भागीदारांसोबत काम करण्यासाठी सौदी अरबमध्ये थांबेल. युक्रेनला शांततेत सर्वाधिक स्वारस्य आहे.”
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात सौदी अरबमध्ये युक्रेनसोबत बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, शांतता कराराची रूपरेषा आणि प्रारंभिक युद्धविरामासाठी कीवसोबत चर्चा सुरू आहे.
विटकॉफ म्हणाले की, मागील शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या दुर्दैवी बैठकीनंतर झेलेन्स्की यांच्या पत्रामुळे ट्रम्प आनंदित आहेत. त्यांनी म्हटले, “त्यांना (ट्रम्पना) असं वाटलं की झेलेन्स्की यांचे पत्र एक खूपच सकारात्मक पाऊल होतं. त्यात माफी मागण्यात आली होती. त्यात हे मान्य करण्यात आलं होतं की, अमेरिकेने युक्रेनसाठी खूप काही केलं आहे. त्याचबरोबर त्यात कृतज्ञतेची भावना होती.”
हे ही वाचा:
परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणतात, पीओके घेण्यापासून कोण रोखत आहे?
महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात
छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला; अनिल परबांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ते कदाचित पुढील दीड महिन्यात सौदी अरबचा दौरा करतील, परंतु त्यांनी तारीख जाहीर केली नाही. मागील शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प व अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यात सार्वजनिकपणे तीव्र वाद झाला होता, जो संपूर्ण जगाने पाहिला.