आम्ही त्यांना गर्ल कॅडेट म्हणत नाही तर त्या फक्त कॅडेट आहेत. कारण राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएमध्ये त्या प्रशिक्षण घेताना सर्वांप्रमाणेच प्रशिक्षण घेतात, असे एनडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एनडीएमधून १७ महिला कॅडेट्सची पहिली तुकडी गुरुवारी उत्तीर्ण होऊन बाहेर पडली, त्यावेळी या अधिकाऱ्याने हे उद्गार काढले. आता सर्वत्र या महिला कॅडेट्सचे कौतुक होत आहे.
पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) मधून १७ महिला कॅडेट्सची पहिली तुकडी गुरुवारी ३०० पुरुष कॅडेट्ससोबत उत्तीर्ण होऊन बाहेर पडली. एनडीएच्या खडकवासला येथील ‘खेत्रपाल परेड ग्राउंड’ वर पार पडलेल्या दीक्षांत समारंभात, कॅडेट्सनी ‘अंतिम पग’ची रेषा ओलांडली. १४८ व्या बॅचच्या परेडचे नेतृत्व अकॅडमी कॅडेट कॅप्टन उदयवीर नेगी यांनी केले, तर मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी परेडची समीक्षा केली.
देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे हे प्रमुख असताना प्रथम महिला कॅडेट्सना एनडीएत स्थान दिले. ही पहिली तुकडी उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर जनरल नरवणे म्हणाले की, भारतीय लष्कराच्या देदिप्यमान वाटचालीत हा एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. मला खात्री आहे की अधिकारी म्हणून या कॅडेट्सही आघाडीवर राहून काम करतील आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील. जनरल नरवणे लष्करप्रमुख असताना एनडीएच्या १४१व्या पासिंग परेडचे निरीक्षण केल्यानंतर म्हणाले होते की, पुढील ४० वर्षात महिला अधिकारी तिथे असतील जिथे मी आज आहे. अर्थात महिला अधिकारीदेखील लष्करप्रमुख होऊ शकतील, असा नरवणे यांच्या म्हणण्याचा अर्थ होता.
या कॅडेट्सपैकी इशिता शर्मा म्हणते की, सर्वांना समान संधी मिळाली की, प्रत्येकाला नैसर्गिकरित्या क्षमता प्राप्त होते. इशिता त्यावेळी कॉमर्स पदवीचे शिक्षण घेत होती, तेव्हाच सेनादलाचे दरवाजे महिलांसाठी खुले झाल्याचे तिला कळले. ती म्हणाली की, मी लगेच या संधीचा लाभ उठविण्याचे ठरविले आणि आज मी इथे आहे. ती म्हणते की, तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा एनडीएत प्रवेश केला तेव्हा मी वेगळी होते. आत्ममग्न राहात असे पण आता मी अनेक मित्र तयार केले आहेत. माझे व्यक्तिमत्त्व इतके आमूलाग्र बदलून जाईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.
या १७ कॅडेट्सपैकी ९ कॅटेड्स या लष्करात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी देहरादून येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांचा प्रवेश होईल. तर पाच जणी डुंडीगल, हैदराबाद येथील हवाई दल प्रशिक्षण केंद्रात जातील. तर तीन जणी या केरळातील एझिमाला येथील नौदल प्रशिक्षण केंद्रात जातील.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मे रोजी मध्यप्रदेश दौऱ्यावर
पीओकेमध्ये दोन वर्षांत भव्य श्रीराम मंदिर
पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते…
दिल्ली पोलिसांनी केले १००० बांगलादेशींना हद्दपार!
एनडीएमध्ये आणखी १२६ कॅडेट्स आहेत ज्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
जनरल सिंह यावेळी म्हणाले, “हा क्षण समावेशकता आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आपल्या सामूहिक वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा आहे.” त्यांनी महिला कॅडेट्सना “नारी शक्ती” असे संबोधून सांगितले की, “या महिला केवळ महिलांच्या विकासाचेच नव्हे, तर महिला-संचालित विकासाचे प्रतीक आहेत.”
एकूण ३३९ कॅडेट्सना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) कडून पदवीप्रदान करण्यात आले, ज्यामध्ये या १७ पथदर्शक महिला कॅडेट्सचाही समावेश होता. यापैकी, ८४ कॅडेट्सना BSc, ८५ कॅडेट्सना कम्प्युटर सायन्स, ५९ कॅडेट्सना BA, आणि १११ कॅडेट्सना B.Tech पदवी देण्यात आली.
BA विभागात प्रथम क्रमांक मिळवणारी डिव्हिजन कॅडेट कॅप्टन श्रुती दक्ष हिने इतिहास रचला. ती म्हणाली, “तीन वर्षांची प्रशिक्षणाची वाटचाल ही भावनांनी भरलेली होती. सुरुवातीला रुळायला वेळ लागला, पण प्रशिक्षक व स्टाफच्या मदतीने मी हळूहळू समायोजित झाले.” श्रुतीच्या वडिलांचा ही एनडीए बॅकग्राउंड असून ते देखील त्याच स्क्वॉड्रनचे माजी विद्यार्थी आहेत.
