रचीन रवींद्र (१०८) आणि केन विल्यम्सन (१०२) यांच्या तडाखेबंद शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी न्यूझीलंडची गाठ भारताशी पडेल. गट साखळीत भारताने न्यूझीलंडला नमवले होते, त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी किविना आहे.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३६२ धावांचे मोठे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे ठेवले, पण दक्षिण आफ्रिकेला ३१२ धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने १०० धावा केल्या खऱ्या पण त्याला आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.
न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग २१ धावांवर बाद झाला पण रचीन आणि विल्यम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी करत आपल्या संघाला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. रचीन बाद झाल्यावर डॅरील मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी ४९ धावा करत आपल्या संघाला एक भक्कम धावसंख्या गाठून दिली. ६ विकेट्सच्या मोबदल्यात न्यूझीलंडने ३६२ धावा केल्या.
हे ही वाचा:
‘अकबर’ बलात्कारी होता तर ‘औरंगजेब’ने असंख्य हिंदूंची हत्या केली!
सावरकर बदनामी प्रकरणी न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना दंड!
केंब्रिज विद्यापीठात दोनदा नापास होणाऱ्या राजीव गांधींची पंतप्रधान पदी निवड आश्चर्यकारक!
भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन
दक्षिण आफ्रिकेच्या एनगिडीने ३ तर रबाडाने २ बळी मिळवले.
या धावसंख्येला उत्तर देताना टेम्बा बाऊमा (५६) आणि ड्युसेन (६९) यांनी १०५ धावांची भागीदारी करत अपेक्षा उंचावल्या पण ही जोडी फुटल्यावर दक्षिण आफ्रिकेचे एकेक फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. डेव्हिड मिलरने १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या पण ती खेळी वाया गेली.
मिलर एकीकडे किल्ला लढवत असताना त्याला समोरून कुणाचीही साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांना ५० षटकात ३१२ धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.