पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आणि भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची किंमत इस्लामाबादला मोजावी लागेल असा इशाराही दिला. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील नॉर्दर्न कमांडमधील सैनिकांशी संवाद साधताना संरक्षण मंत्री सिंह यांनी पुन्हा सांगितले की, ऑपरेशन सिंदूरला फक्त विराम देण्यात आला आहे आणि दहशतवादाच्या माध्यमातून भारताला घाव देण्याची पाकिस्तानची कोणतीही मोहीम यशस्वी होणार नाही. दरम्यान, यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा आणि इतर वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकारी उपस्थित होते.
“आम्ही त्यांचे मनसुबे उधळून लावलेच, अन अशी प्रत्युत्तरात्मक कारवाईही केली की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला पाकिस्तानला खूप महागात पडेल, असे संरक्षण मंत्री म्हणाले. संरक्षण मंत्र्यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या मजबूत भूमिकेची पुष्टी केली आणि सांगितले की दहशतवादी कृत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत ताकदीने आणि रणनीतीने प्रत्युत्तर देईल.
ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांसाठी एक शक्तिशाली संदेश दिला की नवा भारत ‘खंबीर’, ‘दृढनिश्चयी’ आहे आणि यापुढे दहशतवादाला बळी पडणार नाही, तर ताकदीने आणि रणनीतीने प्रत्युत्तर देईल.”
हे ही वाचा :
डीजीसीएचा एअर इंडियावर कारवाई आदेश
कढीपत्ता : आरोग्याचा अमूल्य खजिना
अचूक हल्ल्यात कुद्स फोर्सचे दोन वरिष्ठ कमांडर ठार
केंद्र सरकारने सुरु केले नाविन्यपूर्ण ‘स्टार्टअप चॅलेंज’
पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यात सशस्त्र दल आणि गुप्तचर संस्थांनी दाखवलेल्या अचूकता, समन्वय आणि धाडसाचे त्यांनी कौतुक केले आणि भारताच्या दहशतवादाबाबतच्या धोरणात बदल हा या अतुलनीय शौर्याचा आणि समर्पणाचा परिणाम असल्याचे प्रतिपादन केले.
ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्करी कारवाई नसून, सीमेपलीकडील दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना इशारा आहे कि, जर भारताच्या एकतेला आणि अखंडतेला धक्का बसला तर भारत योग्य उत्तर देईल. मी माझ्या शेजारी देशाला हे सांगू इच्छितो की, “ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. हा फक्त एक विराम आहे, असे संरक्षण मंत्री सिंह म्हणाले.
