उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मान गावात शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी हिमस्खलन होऊन मोठा अपघात झाला. या घटनेत तब्बल ५७ कामगार बर्फाखाली अडकले होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आता ४७ कामगारांची सुटका करण्यात यश आले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन म्हणाले की, “५७ कामगारांपैकी दोन रजेवर गेले होते, त्यामुळे तेथे ५५ कामगार होते. दरम्यान, सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील मान या गावाजवळ शुक्रवारी सकाळी हिमस्खलन होऊन बीआरओचे ५५ मजूर अडकले होते. त्यापैकी ४७मजुरांची सुटका करण्यात यश आले आहे. त्यांना आता इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या तळावर आणण्यात आले आहे. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ मजुरांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. रात्री कमी प्रकाशमानतेमुळे काही काळ बचावकार्य स्थगित करण्यात आले होते. मजुरांची सुटका करण्यासाठी अनेक पथके काम करत असून त्यांच्यासमोर कठीण भूप्रदेश, जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचे आव्हान आहे.
दुर्घटनाग्रस्त मजूर हे या भागात पडलेला बर्फ हटवण्याच्या कामासाठी तैनात होते. त्यांच्या छावणीवर हिमकडा कोसळून ते त्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणीही मृत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा :
ट्रम्प विरुद्ध झेलेन्स्की: शांतता, युद्धाच्या मुद्द्यावरून झाली बाचाबाची
ट्रम्प यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर झेलेन्स्की यांचा माफी मागण्यास नकार
पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ
सरकारी योजनांच्या निधीसाठी काँग्रेसशासित सुखू सरकारने मंदिरांपुढे पसरले हात
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सुरू असलेल्या बचाव कार्याचा सतत आढावा घेत आहेत. हिमस्खलनाशी संबंधित मदत किंवा माहिती मिळविण्यासाठी उत्तराखंड सरकारने शुक्रवारी लोकांना हेल्पलाइन क्रमांक जारी केले. उत्तराखंड सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने (डीआयपीआर) दिलेल्या माहितीनुसार, लोकांना उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्यास प्रोत्साहित केले जात आहे. उत्तराखंड सरकारने खालील हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेतः मोबाईल क्रमांकः ८२१८८६७००५, ९०५८४४१४०४; दूरध्वनी क्रमांकः ०१३५ २६६४३१५; टोल फ्री क्रमांकः १०७०. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी बोलून या घटनेत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे आश्वासन दिले.