अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली. या भेटीदरम्यान काय निष्पन्न होणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष होते. परंतु, या बैठकीत अनपेक्षित घटना घडली. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या अनौपचारिक संभाषणाचे रूपांतर जोरदार वादविवादात झाले. युद्ध आणि शांतता यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
ओव्हल ऑफिसमध्ये बैठक सुरू असताना, झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात जोरदार वाद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, या वादविवादानंतर झेलेन्स्की निघून गेले शिवाय त्यांनी याबद्दल माफी न मागण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे म्हटले की ही परिस्थिती दोन्ही देशांसाठी चांगली नव्हती. वादविवादानंतर, झेलेन्स्की यांनी ‘फॉक्स न्यूज’ला एक मुलाखत दिली, ज्यामध्ये शोचे होस्ट ब्रेट बायर यांनी झेलेन्स्की यांना विचारले की या बैठकीत जे घडले त्याबद्दल ते माफी मागणार का? यावर, झेलेन्स्की यांनी म्हटले की, “नाही, मी राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन लोकांचा आदर करतो. आपण बोलताना खुले आणि प्रामाणिक असले पाहिजे. मला वाटत नाही की काही चूक केली आहे.” पुढे त्यांनी ट्रम्प आणि अमेरिकन जनतेने सतत पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “दिलेल्या सर्व पाठिंब्याबद्दल मी अमेरिकन लोकांचा खूप आभारी आहे. तुम्ही खूप काही केले. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि काँग्रेसचा आभारी आहे. तुम्ही आम्हाला खूप मदत केली. सुरुवातीपासूनच, तीन वर्षांच्या आक्रमणादरम्यान, तुम्ही आम्हाला टिकून राहण्यास मदत केली.”
सुमारे ४६ मिनिटे चाललेल्या पत्रकार परिषदेतील शेवटची ८ मिनिटे वादविवादांमध्ये गेली. ट्रम्प यांनी पत्रकारांना निघून जाण्यास सांगितले आणि ते टीव्हीसाठी चांगले होईल असे सांगितले. जेव्हा झेलेन्स्की यांना विचारण्यात आले की ही चर्चा युक्रेनच्या हिताची आहे का? तर ते म्हणाले की, हे दोन्ही देशांसाठी योग्य नव्हते. झेलेन्स्की म्हणाले की, केवळ ट्रम्पच नाही तर आम्हाला स्वतःलाही हे युद्ध थांबवायचे आहे. कारण आपण हे युद्ध लढत आहोत आणि त्याचे दुष्परिणाम भोगत आहोत. ट्रम्प यांनी यापूर्वीच म्हटले आहे की ते हे युद्ध थांबवू शकतात आणि आम्हाला त्यांनी तसे करावे असे वाटते. झेलेन्स्की यांना विचारण्यात आले की ही चर्चा बंद दाराआड व्हायला हवी होती का आणि त्यांना त्याबद्दल पश्चात्ताप झाला का? यावर झेलेन्स्की म्हणाले, हो, मला वाटते की हे बरोबर नव्हते. तसेच वॉशिंग्टनच्या पाठिंब्याशिवाय युक्रेन रशियन सैन्याविरुद्ध जिंकू शकेल किंवा स्वतःचा बचाव करू शकेल का असे विचारले असता, झेलेन्स्की यांनी म्हटले की ते फारच कठीण होऊन जाईल.
हे ही वाचा:
केजरीवाल या जन्मात तरी तिहारमधून बाहेर पडणार नाहीत!
पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ
तेलुगू भाषेतही आता ‘छावा’ची गर्जना!
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर जोरदार टीका केली. लाखो लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांच्या कृतींमुळे तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. यानंतर, झेलेन्स्की अचानक अमेरिकेसोबतच्या महत्त्वाच्या खनिज करारावर स्वाक्षरी न करता व्हाईट हाऊसमधून निघून गेले. ट्रम्प यांनी या कराराची मागणी केली होती आणि युक्रेनला भविष्यात पाठिंबा देण्यासाठी ही एक अट असल्याचे म्हटले होते. ट्रम्प, झेलेन्स्की आणि शिष्टमंडळ कॅबिनेट रूमच्या बाहेर दुपारचे जेवण करणार होते, परंतु असे काही घडले नाही.