सीमेवर सुरू असलेले एक युद्ध थंडावले आहे. देशात वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे. भाजपा आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना देशाचे गद्दार म्हणतायत. या दरम्यान आतंरराष्ट्रीय दहशतवादी हाफीज सईदचा एक व्हीडियो व्हायरल झाला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा तर तो काँग्रेसकडे बोट दाखवून म्हणतोय, भारत मे कुछ अच्छ लोग भी है.
घ्या! भारताच्या विरोधात जिहाद पुकारणाऱ्या हाफीजने स्पष्ट करून टाकले आहे की कोण वाईट कोण भला. हाफीजच्या मनात काँग्रेसबाबत हे जे प्रेम आहे, ते अधिक गहिरे करण्याचे काम सुप्रिया श्रीनेत, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे लोक करतायत.
काळ, काम, वेगाचे गणित समजलेला विजय वडेट्टीवार नावाचा अत्यंत दुर्मीळ बुद्धिमत्तेचा नेता काँग्रेसकडे आहे. दहशतवाद्यांना कोणत्या कामासाठी वेळ असतो किंवा नसतो, हे जर तुम्हाला माहित नसेल तर वडेट्टीवारांना जाऊन भेटा. धर्म विचारण्या इतका दहशतवाद्यांना वेळ असतो का, हा सवाल त्यांनीच विचारला होता. पुढे युगेन युगे जपून ठेवावा असा मेंदू आहे, कारण याच्या अगाध ज्ञानाला अंतच नाही. ते संरक्षण विश्लेषक आहेत, देशातील लष्करी अधिकाऱ्यांपेक्षा जास्त त्यांना कळते याचा उलगडाही अलिकडचाच. १५ हजार रुपयांचे ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांच्या मिसाईलचा वापर
कऱण्यात आला, हे त्यांचे ताजे संशोधन.
भारताच्या हवाई कवचाचे अनेक पदर होते. क्षेपणास्त्र आणि फायटर विमानांसाठी एस ४०० आणि बराक क्षेपणास्त्राचा वापर झाला. आकाश क्षेपणास्त्रांच्या वेगवेगळ्या आवृत्यांचा वापर करण्यात आला, ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी भारताने डीएस४ सारख्या एण्टी ड्रोन प्रणालीचा वापर केला. बीईएल निर्मित आकाशतीर ही प्रणाली वापरली ज्यात तुर्कीये निर्मित कामिकाझे ड्रोनसोबत सोनगात्री, इयात्री सारख्या आकाराने अत्यंत छोट्या ड्रोनचा समावेश आहे.
याचा अर्थ भारताने ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी ड्रोन वापरले. क्षेपणास्त्र पाडण्यासाठी क्षेपणास्त्र वापरली. परंतु इश्वराने तोंड वाट्टेल ते बोलण्यासाठीच दिलेले आहे, हा वडेट्टीवार आणि त्यांच्या मालकांचा ठाम विश्वास असल्यामुळे बरळणे हे शहाणपण आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. वाचन नाही, अभ्यास नाही. इश्वर कृपेने मिळालेला बिनडोकपणा एवढाच बोलबच्चन कऱण्याचा आधार. भारताची राफेल विमाने पडली आहेत, असेही हा महाभाग म्हणाला. तोंडाने सगळी
दुर्गंधी बाहेर काढल्यानंतर म्हणायचे अशी चर्चा आहे. गावगप्पांच्या आधारावर विधाने करणारा हा मठ्ठ नेता आणि सोशल मीडियाच्या आधारावर भारताची राफेल पाडल्याचा दावा करणारा त्यांचा संरक्षण मंत्री ख्वाचा आसिफ यांच्यात फरक नाही. फक्त ख्वाचा आसिफ जे काही सांगत होता ते त्याच्या देशाच्या पथ्यावर तरी पडणारी होते. विजय बडबडवारची बडबड देशाच्या विरोधात जाणारी आहे.
काँग्रेसमध्ये वर पासून खालपर्यंत अशीच रिकामी मडकी भरलेली आहे. विजय बडबडवार सारख्या तोंडाळ नेत्यांचा सुकाळ आहे. शशी थरूर यांच्यासारखे नेते ज्यांना अक्कल आहे, ते राहुल गांधी यांना खुपतात. कारण ते मोदींची प्रशंसा करतात. सत्य तेच सांगतात. नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर सुरूवातीपासून आगपाखड केली. त्यांचे प्रत्येक पाऊल शत्रूला लाभ पोहोचवण्यासाठीच असते. म्हणून हाफीज सईद सारखे लोक काँग्रेसची तोंड भरून प्रशंसा करत असतात.
काश्मीरमध्ये भारतात काँग्रेसची सत्ता असताना ही मंडळी सुखी होती. आता मोदी सरकार आल्यानंतर त्यांना बिळात लपण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानात सुद्धा ते सुरक्षित नाहीत. ज्यांच्यामुळे भारतातील अनेक लोकांना उर बडवण्याची वेळ आली, असे हे दहशतवादी आता त्यांच्या आप्तांचे जनाजे उचलताना दिसतायत. त्यामुळे त्यांना दहशतवाद्यांना मिठ्या मारणाऱ्या काँग्रेस सरकारची प्रचंड आठवण येत आहे.
भारतीय सेनादलांची सरासरी आयु जगातील अन्य देशांच्या तुलनेत खूप जास्त होती. हे वय ३२ वरून २६ वर आणण्याचा प्रयत्न अग्निवीर योजनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत होते. परंतु जेव्हा जेव्हा सरकार सेनादलांना सशक्त कऱण्याचे कोणतेही पाऊल उचलते तेव्हा राहुल गांधी त्याच खोडा घालायला पुढे सरसावतात. अग्निवीरांना फक्त ३१ दिवसांचे ट्रेनिंग दिले जाते, इतक्या कमी प्रशिक्षण काळात ते काय शिकणार असा सवाल ही काँग्रेस नेत्यांनी केला होता.
ऑपरेशन सिंदूरमध्ये अग्निवीरांनी केलेली कामगिरी कमाल आहे. तीन हजार अग्निवीरांनी भारताचे हवाई कवच अर्थात आकाशतीर प्रणालीचे संचालन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. पाकिस्तान चवताळला आहे कारण त्याचे तोंड फुटले आहे. काँग्रेस चवताळली आहे कारण राफेल लढाऊ विमानांनी चमकदार कामगिरी केली, अग्निवीरांनी उत्तम काम केले. केंद्र सरकारने भारताचे संरक्षण भक्कम करण्यासाठी जी पाऊले उचलली ती यशस्वी ठरली म्हणून काँग्रेसचे नेते प्रचंड चरफडतायत.
हे ही वाचा:
मलेशिया मास्टर्स: श्रीकांत, तनिषा-ध्रुव उपांत्यपूर्व फेरीत दाखल
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
जेव्हा सिंदूर दारुगोळा बनतो, तेव्हा काय होते ते शत्रूने पाहिले!
पीरपैंती रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलले !
बोलायला मुद्दे नसले किंवा लोकांनी तुमच्या मुद्द्यांची हवा काढली की यांच्याकडे सावरकर हा एकमेव मुद्दा उरतो. काँग्रेसच्या शिवराळ प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत पुन्हा एकदा सावरकरांवर घसरलेल्या आहेत. या लोकांनी लाजलज्जा सोडली आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण झाली. बांगलादेश युद्धाची आठवण झाली. परंतु त्याच इंदिरा गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची तोंड भरून स्तुती करायच्या याचा मात्र यांना विसर पडतो. शंभरवेळा न्यायालयाने तोंड फोडल्यानंतर सुद्धा हे निलाजरे तीच मुक्ताफळे उधळत असतात.
हे स्वाभाविक सुद्धा आहे, म्हणा ज्यांची प्रशंसा हाफीज सईद सारखा देशाचा दुश्मन करतो, त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत प्रेम आणि आदर असेलच कसा.
ज्ञानी से ज्ञानी मिले, मिले नीच से नीच
पानी से पानी मिले मिले किच से किच
हे त्रिकालबाधित सत्य आहे. पाकिस्तान हा काँग्रेसचा नैसर्गिक भागीदार आहे. त्यांची युती आहे. ही युती येत्या काही काळात अधिक घट्ट होणार आहे. ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानांचा वापर पाकिस्तानने केला, तसा तो भविष्यात सुद्धा होणार आहे. अशा नेत्यांवर कारवाई करून त्यांची थोबाडं बंद करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. जे बोलले ते सिद्ध केले नाही, तर यांची वरात काढण्याची तरतूद कायद्यात करायला हवी.
तेव्हाच हे मुखंड आपले थोबाड आवरतील. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हे वडेट्टीवारांसारख्यांसाठीच लिहिले गेलेले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
