ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच अमेरिकेने मोठे विधान केले आहे. अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सांगितले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जाणून घेण्यासाठी हे शिष्टमंडळ अमेरिकेत आहे. भारतीय शिष्टमंडळाने शुक्रवारी ( ६ जून) लँडौ यांची भेट घेतली.
भारतीय दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले, “डॉ. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री लँडौ यांच्याशी चांगली आणि स्पष्ट चर्चा केली. भारतीय शिष्टमंडळाने त्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या क्रूरतेची आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माहिती दिली.”
उप-परराष्ट्रमंत्री लँडौ यांनी ‘एक्स’ वरील ‘पोस्ट’ द्वारे सांगितले की, भारतीय संसदीय प्रतिनिधींसोबतची बैठक “अद्भुत” होती. ते म्हणाले, “मी पुन्हा एकदा सांगितले की दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत ठामपणे उभी आहे. आम्ही दोन्ही देशांमध्ये विकास आणि समृद्धी वाढविण्यासाठी व्यापार आणि व्यावसायिक संबंध वाढविण्यासह अमेरिका-भारत धोरणात्मक संबंधांवर चर्चा केली.”
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले, लँडौ यांनी “दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीत भारताला अमेरिकेचा भक्कम पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.”
हे ही वाचा :
राहुलजी, २००९ मध्ये ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का?
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
चर्चा अमेरिकेतील मारुती कांबळेची; मस्क यांनी ट्रम्प यांच्या लंगोटीलाच हात घातला…
पंतप्रधान मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचा फोन, G-७ शिखर परिषदेसाठी दिले आमंत्रण!
ते पुढे म्हणाले, दोन्ही बाजूंनी परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढवून द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वावरही व्यापक चर्चा केली.” शिष्टमंडळाने सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे सदस्य सिनेटर क्रिस व्हॅन हॉलेन यांच्याशीही संवाद साधला आणि त्यांना पाकिस्तानमधून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याची माहिती दिली. सिनेटरने भारतात वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांतील बळींबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि सांगितले की अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत आहे.
