उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये तब्बल १४४ वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा भरला असून यासाठी कोट्यवधीच्या संख्येने भाविक येत आहेत. देश- विदेशातून येणारे भाविक हे विविध वाहतुकीच्या साधनांनी प्रयागराजला दाखल होत आहेत. महाकुंभसाठी होणारी भाविकांची गर्दी जशी वाढत आहेत तसा विमान प्रवासही महागला आहे. यामुळे भाविकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशांतर्गत विमान सेवा इतकी महागली आहे की, याहून कमी पैशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास होऊ शकतो. हवाई मार्गाने प्रयागराज गाठण्यासाठी साधारण भाविकांना ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागत आहेत.
महाकुंभ मेळ्याच्या या दिवसांमध्ये विमानांच्या तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. सामान्य दिवशी दिल्लीतून प्रयागराजला जाण्यासाठी १० ते १२ हजार रुपये दर आकारले जातात तर मुंबईतून प्रयागराजला जाण्यासाठी १५ हजारांपर्यंत दर घेतला जातो. परंतु, सध्या महाकुंभ मेळ्यात जाणाऱ्यांना दिल्लीतून प्रयागराज गाठण्यासाठी ५० हजार रुपये आणि मुंबईतून प्रयागराजला येण्यासाठी जवळपास ६० हजार रुपये दर आकारले जात आहेत. यामुळे भाविकांना चांगलाच आर्थिक फटका बसत असून विमान कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढत्या विमान भाड्यावर योग्य नियमन नसल्यामुळे विमान कंपन्यांनी चेन्नईहून महाकुंभच्या फेरीसाठी अगदी ६४ हजार रुपये दर लावला आहे. त्यामुळे मालदीव किंवा बाली सारख्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे विमान प्रवासाचे दर हे याहून कमी असल्याचे लक्षात आले आहे. मालदीवला जाण्यासाठी प्रवाशांना ३० हजारांपेक्षा कमी पैसे मोजावे लागत आहेत, तर दुसरीकडे प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांना ५० हजारांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत.
दिल्लीहून, ३१ जानेवारीच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी ४९,६०० रुपये मोजावे लागत आहेत. इतर दिवशी हेच भाडे ९,०६० रुपये असते. DGCA ने (सिव्हिल एव्हिएशन महासंचालक) सोमवारी विमान कंपन्यांना महाकुंभ दरम्यान प्रयागराजसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच DGCA ने जानेवारीमध्ये ८१ अतिरिक्त उड्डाणे मंजूर केली असून त्यामुळे प्रयागराजची हवाई कनेक्टिव्हिटी देशभरात १३२ फ्लाइट्सपर्यंत वाढली आहे.
मालदीव सारख्या लोकप्रिय स्थळांसाठी आंतरराष्ट्रीय फेरीची किंमत ३०,००० हून कमी आहे, तर प्रयागराज ते प्रमुख शहरांचे विमान भाडे सरासरी ५०,००० हून अधिक असल्याचे दिसून येत आहे. रोजच्या भाड्यापेक्षा ३०० ते ६०० टक्क्यांनी वाढ. त्यामुळे विमान सेवांच्या भाड्यात वाढ करून प्रवाशांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या विमान कंपन्यांवर टीका करण्यात येत आहे. तसेच विमानांच्या किंमातींकडे पाहून अनेक भक्तांनी पर्यायी मार्ग निवडले आहेत.
हे ही वाचा :
मजारवर रातोरात बेकादेशीर बांधकाम, भाजपाच्या तक्रारीनंतर मुस्लिमांनी स्वतःच तोडले!
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामागे पुनर्विकास प्रकल्प? मुलाच्या जबाबात कंबोज आणि अनिल परब यांचा उल्लेख
त्रिपुरात ५ दिवसांत १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, तस्करही ताब्यात!
झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक; तोडफोडीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
भारतातील देशांतर्गत उड्डाणे हा एकेकाळी परवडणारा पर्याय होता. पण, हल्ली आंतरराष्ट्रीय प्रवास अनेकदा काही देशांतर्गत मार्गांपेक्षा स्वस्त असल्याचे समोर आले आहे. उदाहरणार्थ, दिल्ली ते कोची किंवा गुवाहाटी या फेरीसाठी काही विशिष्ट ऋतूंमध्ये बँकॉक, दुबई किंवा युरोपला जाणाऱ्या फ्लाइटपेक्षा जास्त किंवा त्याहूनही जास्त खर्च येऊ शकतो.