मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींवर सडकून टीका केली. सावरकरांची देशभक्ती आणि हिंदुत्व प्रज्वलित झाल्यास आपले काही खरे नाही हे त्यांना माहितीये, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. दरम्यान, वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या खटल्यामध्ये राहुल गांधींना झापणाऱ्या न्यायमूर्तींचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईत विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, काही मूर्ख लोक त्यांना माफीवीर म्हणतात. त्यांना मला एवढेच सांगावेसे वाटते कि त्यांनी वीर सावरकरांच्या काल कोठडीत जाऊन ११ वर्षे नाहीतर ११ तास घालवून दाखवावे. असे केल्यास त्यांना मी पद्मश्री देईन. पण तुम्ही ते देखील घालवू शकत नाही.
ते पुढे म्हणाले, मला तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तींचे आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी या लोकांची जागा दाखवली आणि त्यांना सांगितले कि यापुढे वीर सावरकरांवर अशा प्रकारे जर काही बोललात तर तुम्हाला आम्ही माफ करणार नाही तर शिक्षा देवू.
हे ही वाचा :
आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व समजले
आजी-आजोबांच्या बटव्यातली ‘हींग’ करते अनेक आजारांवर उपाय!
पाकिस्तानचे हे प्रॉक्सी वॉर नाही, हे सुनियोजित युद्ध आहे…
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात वीर सावरकांचा त्यावेळेचा संघर्ष समोर आणला. त्यांनी केलेल्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आंतरजातीय विवाह संदर्भात देखील पुढाकार घेतला होता. मराठी भाषेत प्रमाण भाषा तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
‘विधिमंडळ’, ‘चित्रपट’ असे शब्द त्यांनी दिले आहेत. ‘निवृत्ती वेतन’ हा शब्द देखील त्यांनी दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सावरकर यांचे हिंदुत्व देखील विज्ञाननिष्ठ होते. ते व्यक्ती नव्हे, ते एक संस्था होते. त्यांच्या नावाने संशोधन केंद्र सुरु होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आणि यासाठी निधी अपुरा पडू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
