महाकुंभ मेळ्याचा आजचा सातवा दिवस असून आतापर्यंत करोडो भाविकांनी स्नान केले आहे. लाखो भाविक दररोज मेळ्यात सहभागी होत आहेत. युपीसह देशात आनंदाचे वातावरण असताना महाकुंभात एक दुर्घटना घडली आहे. महाकुंभमेळा परिसरात भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. आगीमुळे तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहेत.
सेक्टर १९ च्या तंबूमध्ये ही आग लागली. आगीमुळे अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. आगीचे फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून घटनास्थळी आधीच उभ्या असलेल्या अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या समन्वयाने तातडीने प्रयत्न सुरू केले आणि अल्पावधीतच आग यशस्वीपणे आटोक्यात आणली.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, प्रयागराज झोनचे एडीजी भानू भास्कर यांनी सांगितले की, “महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन-तीन सिलिंडरचा स्फोट झाला, त्यामुळे शिबिरांमध्ये मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सर्व लोक सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झालेले नाही”.
आजूबाजूच्या तंबूत राहणाऱ्या लोकांना सुरक्षिततेसाठी बाहेर काढण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन आगीत बाधित झालेल्यांना मदत देण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा :
ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरवर दु:खाचा डोंगर, मामा-आजीचा अपघातात मृत्यू!
आव्हाड भाऊ आरोपी मोहम्मद शहजाद आहे बरं!
सैफ अली खानवर हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा न्यायालयात दावा!
दुचाकी क्रमांक आणि चेहरा ओळखण्यात आल्याने आरोपी सापडला