पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘परीक्षांबद्दल’ चर्चा केली आणि विद्यार्थ्यांना विशेष टिप्स दिल्या. पंतप्रधान मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची २०१८ मध्ये सुरुवात केली होती. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. पंतप्रधान मोदी कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेमधील यशासाठी आणि परीक्षा काळात तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन करतात. आजच्या भागातही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमामध्ये निसर्गाचे रक्षण करण्याबाबत एका विद्यार्थ्याने पश्न विचारला होता. यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निसर्गाचे शोषण ही आपली संस्कृती नाही. निसर्गाचे रक्षण करेल अशी आपली जीवनशैली असली पाहिजे. परीक्षेच्या पेपरातील चुका टाळण्यासाठी काय करावे लागेल असा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना, पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना मागील वर्षांचे पेपर सोडवण्यास आणि त्यांचा सराव करण्यास सांगितले.
अपयशाच्या भीतीवर मात कशी करावी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जीवन म्हणजे परीक्षा नाही. जर तुम्ही अपयशी ठरलात तर तुम्हाला आणखी एक संधी मिळेल. अशामुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडू देवू नका. जीवन मौल्यवान आहे, परीक्षेचा निकाल नाही. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले की आपण सतत आपले सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत.
हे ही वाचा :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिवेणी संगमात केले स्नान!
आपचा दारूण पराभव हा यमुनेच्या शापामुळे!
राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेचं काँग्रेस उद्ध्वस्त होतेय!
बांगलादेशातील हिंसाचारानंतर युनूस सरकारला आठवण झाली कारवाईची!
पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले, आपण स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. जो स्वतःशी स्पर्धा करतो त्याचा विश्वास कधीही तुटत नाही. स्वतःला कधी एकटे पडू देवू नका सतत कामात रहा. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या मनात जे काही आहे ते कोणत्याही संकोचाशिवाय बोलले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. वयाचा विचार न करता लिहिण्याची सवय आणि उन्हात बसण्याची सवय लावण्याचा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी केवळ नरेंद्र मोदी यांचा सहभाग नसून यंदा वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीपिका पदुकोण, मेरी कोम, अवनी लेखरा, रुजुता दिवेकर, सोनाली सभरवाल, फूडफार्मर, विक्रांत मेस्सी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता यांचाही समावेश असणार आहे. हे विविध क्षेत्रातील यशस्वी दिग्गज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.