राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दिष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी झाली असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात १०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. ३०० युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा..
‘राहुल गांधी नव्या प्रकारचे हवामानशास्त्रज्ञ, पराभवाचे हवामानशास्त्रज्ञ!
तेलंगणात मंत्रिमंडळ विस्तार, कुणाला मिळाली संधी ?
चोरांनीच दिली ग्रामास्थांविरुद्ध तक्रार !
मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या काळाची केली श्री श्री रविशंकर यांनी प्रशंसा
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हरित इमारतीसाठी असलेली सर्व मानके पूर्ण करणारी, निसर्गाचा पूर्णपणे उपयोग करणारी, ऊर्जेची बचत करणारी आणि आवश्यक असणारी ऊर्जा १०० टक्के निर्माण करणारी, महाऊर्जाची ही नवी इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे. ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात, महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या २ वर्षात देशभरात ४ लाख कृषी पंप बसाविण्यात आले असताना राज्याने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देत ५ लाख सौर कृषीपंप बसविले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून १६ हजार मेगा वॉट क्षमतेचे फिडर २०२६ पर्यंत सौर ऊर्जेवर परिवर्तीत करण्यात येणार आहेत. त्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. विभाजित पद्धतीने असलेला, आशियातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. एकूणच सौर, पवन आणि हायड्रोजन क्षेत्रातही राज्याने भरारी घेतली असल्याचे फडणवीस म्हणाले.
