वर्षा हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान. या निवासस्थानाने अनेक मुख्यमंत्री येता-जाताना पाहीले आहेत. इथल्या लॉनमध्ये रेड्याचे मंतरलेले शिंग पुरले असल्याची खळबळजनक माहिती, उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी उघड केलेली आहे. इतकी वर्षे राजकारणात काढल्यानंतरही संजय राऊत अजून शोध पत्रकाराच्या भूमिकेतून बाहेर पडलेले नाहीत. एका बाजूला पक्षप्रमुख सांगतात की मला शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही. दुसऱ्या बाजूला प्रवक्ते तंत्र-मंत्राची भाषा करतात. बऱ्याच काळात नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूची चर्चा होते आहे.
जिथे स्वकर्तृत्वावर सत्ता मिळण्याची शक्यता संपते तिथे तंत्र आणि काळ्या जादूची सुरूवात होते. बुवा तेथे बाया हे आचार्य़ अत्रेंचे गाजलेले नाटक. राऊतांवर विश्वास ठेवावा तर महाराष्ट्रात सध्या बुवा तेथे नेते, असा नवा प्रयोग सुरू झाला आहे. काही राजकारणी पक्षातील मुत्सद्यांना बाजूला ठेवून बुवांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. वर्षा बंगल्याच्या लॉन खाली जर रेड्याचे मंतरलेले शिंग पुरलेले असेल तर ते एक गुवाहाटीत, कामाख्या मंदीरा शेजारी कापलेल्या रेड्याचेच असेल, असे काही जरुरी नाही. मंत्र तंत्राचे प्रयोग मंदिरांपेक्षा दर्ग्यांमध्ये जास्त होतात. अमजेरच्या दर्ग्याला भेट देणारे भाविक तिथे बळीही देतात. त्यामुळे संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे शिंग पुरलेली असतीलच तर त्या रेड्याचा बळी गुवाहाटी ऐवजी अजमेरमध्ये झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१९ ते २०२२ च्या दरम्यानही शिंगे पुरलेली असू शकतात.
हे तंत्र-मंत्राचे काळ्या जादूचे प्रयोग करण्यात बंगाली बाबांचा हात कोण धरेल? काही काळापूर्वी मुंबईच्या लोकलचे डबे याच बंगाली बाबांच्या जाहिरातींनी भरले होते. बाबा रजा खान बंगाली, मुसा बंगाली, अमुक बंगाली आणि तमुक बंगाली. वशीकरण, मुठ, करणी, किया कराया, भूत-प्रेत सबका जालीम इलाज. अशा मनोरंजक जाहिराती असलेली हँडबिले डब्यात, मुतारीत, सुलभ शौचालयात चिकटवलेली असत.
हे ही वाचा:
इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात प्रवेश
समान नागरी कायद्यासाठी आता गुजरातचा पुढाकार
अतुल भातखळकरांनी घेतली त्यांच्या १०१ वर्षांच्या आजीची सदिच्छा भेट!
महाकुंभ: भूतानच्या राजाचे संगमात स्नान!
उबाठा शिवसेनेने जे नवं मतदार जोडले आहेत, त्यापैकी कुणी तरी साहेबांचे मुख्यमंत्रीपद टिकावे म्हणून वर्षा बंगल्यात रातोरात काही कांड केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापि सागर बंगल्यावरून मुक्काम हलवलेला नाही. त्यावरून राऊत सुतावरून स्वर्ग गाठून मोकळे झाले. फडणवीस वर्षावर जात नाहीत, त्यांना कोणती भीती वाटते आहे, कोणते दडपण आहे, असा सवाल राऊत करताय. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. वर्षा बंगल्यावर डागडुजीचे काम सुरू आहे, ते पूर्ण झाल्यावर फडणवीस तिथे मुक्काम हलवतील. उद्या जेव्हा फडणवीस वर्षावर जातील तेव्हा राऊत नवा दावा करतील. फडणवीस जेव्हा सागर बंगल्यावर होते, तेव्हा वर्षा बंगल्यावर डागडुजीचे नाही तर लॉन खालून रेड्याची शिंगे काढण्याचे कामच सुरू होते. वर्षावर शुद्धी होम कऱण्यात आला, असे दावे राऊत करू शकतात. हे दावे न संपणारे आहेत.
शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्ही मानत नाही, कर्मकांडे आम्हाला मान्य नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे, रामदास कदम यांनी. ठाकरे जेव्हा वर्षासोडून गेले तेव्हा तिथे टाचणी लावलेले लिंबू सापडल्याचा दावा केला होता. कदम यांच्या म्हणण्याचा भावार्थ असा होता, शेंडी जानवे चालत नसले तरी बंगाली बाबांची लिंबू-मिर्ची मात्र चालते. संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर काळ्या जादूचे आरोप केले, शिंदे दर अमवास्येला, पौर्णिमेला कुठली शेती करायला गायब होतात, हा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. रामदास कदम यांनी वर्षावर लिंबू सापडले होते, असा गौप्यस्फोट करून उबाठा शिवसेनेवर आरोप केले. विभागल्या गेलेल्या शिवसेनेचे नेते एकमेकांचे कपडे उतरवण्याचे काम करतायत. काळी जादू करून मुख्यमंत्री बनण्यासाठी प्रयत्न करता येतात, अशी नवी दिशा राऊत महाराष्ट्राच्या जनतेला आणि होतकरू राजकारण्यांना देत आहेत. जनतेला फुकटात तमाशा दाखवतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)