महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवार, १३ मे रोजी दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यंदा १० वीचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला. या परीक्षेसाठी राज्यभरातून नऊ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा यंदाचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून यंदा उत्तीर्णतेचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत १.७१ टक्क्यांनी घटले. या परीक्षेसाठी राज्यभरातून नऊ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे कोकण विभागाने ९८.८२ टक्केवारीसह अव्वल स्थान पटकवले आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून, तो ९०.७८ टक्के आहे.
मुलींचा एकूण निकाल ९६.१४ टक्के लागला असून, मुलींनीच दहावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे. यंदा दहावीला पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, लातूर, नाशिक आणि रत्नागिरी या नऊ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा..
ब्रह्मोस क्षेपणास्त्राने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी
कपालभाती प्राणायाम : जाणून घ्या योग्य पद्धती कोणती ?
विभागनिहाय टक्केवारी
- कोकण विभाग – ९८.८२ टक्के
- कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
- मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
- पुणे विभाग – ९४.८१ टक्के
- नाशिक विभाग – ९३.०४ टक्के
- अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
- छत्रपती संभाजीनगर – ९२.८२ टक्के
- लातूर विभाग – ९२.७७ टक्के
- नागपूर – ९०.७८ टक्के
