महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. फर्स्ट पोस्टच्या एका कार्यक्रमात निमंत्रित म्हणून अमेरीकी अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स भारतात आले होते. पल्की शर्मा उपाध्याय यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी सॅक्स यांनी भारताला अमेरिकेबाबत इशारा दिला होता. भारताने सावध राहावे, चीनला झोडण्यासाठी अमेरिका भारताचा वापर करू इच्छिते. डोण्ट प्ले अमेरीकाज गेम… असे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्यांच्या सल्ल्याचा एका महिन्याच्या आत प्रत्यय येतो आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाच्या विरोधात टेऱीफ वॉर छेडले होते, त्याच दरम्यान झालेली ही मुलाखत आहे. पल्की शर्मा उपाध्याय हा छोट्या स्क्रीनवरचा अत्यंत लोकप्रिय चेहरा. ग्लॅमर ही फक्त सिनेमा आणि मॉडलिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नट्यांची मक्तेदारी नाही, हे न्यूज चॅनलवरील ज्या मोजक्या निवेदकांनी सिद्ध केले आहे त्यात पल्की नंबर वन आहे. बोलका चेहरा, स्पष्ट उच्चार, टोकदार प्रश्न, दर्जेदार उपहास ही तिची वैशिष्ट्य. तिने जेफ्री सॅक्स यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत सॅक्स यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांचे वाभाडे काढले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हेन्री किसिंजर यांच्या एका विधानाचा दाखला देऊन जेफ्री यांनी आपले मत स्पष्ट केले. किसिंजर असे म्हणायचे की, ‘इट मे बी डेंजरस टू बी अमेरिकाज एनिमी, बट टू बी अमेरिकाज फ्रेण्ड इज फेटल.’ जेफ्री म्हणाले की, ‘अमेरीकेने ज्या देशाशी हात मिळवला, तो उद्ध्वस्त झाला, हा अमेरिकेचा इतिहास आहे. अमेरिकेला भारताचा वापर करायचा आहे, चीनला झोडायचे आहे. फूट पाडा आणि राज्य करा ही अमेरीकेची नीती आहे आणि ही नीती त्यांनी ब्रिटनकडून उचलली आहे. भारताने अमेरीकेच्या जाळ्यात येऊ नये.’
जेफ्री सॅक्स ही काही सामान्य असामी नाही. बोलिव्हीया, पोलंड, रशिया या देशांचे ते आर्थिक सल्लागार राहिलेले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक सरचिटणीसांसाठी त्यांनी विशेष सल्लागार म्हणून काम केलेले आहे. त्यांची मुलाखत ज्यांनी ऐकली त्यांना लक्षात आले असेल की ते भारताचे हितचिंतक आहेत. भारताच्या क्षमतेबाबत त्यांना विश्वास आहे. इंडीया इज टू बिग टू बी युटीलाईज्ड… हे त्यांचे ठाम मत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान आणि त्यानंतर अमेरिकेने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये आपण शांतता प्रस्थापित केली हे जगाला दाखवण्यासाठी ट्रम्प यांनी बऱ्याच उचापती केल्या. अखेर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युरोपच्या भूमीवरून त्यांना स्पष्ट ऐकवले. ‘संघर्ष थांबावा म्हणून अनेक देशांचे नेते, मुत्सद्दी आमच्याशी बोलत होते. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितले की, भारताशी सुरू असलेला संघर्ष बंद व्हावा असे जर पाकिस्तानला वाटत असेल तर त्यांच्या मिलिटरी जनरल्सनी भारताच्या जनरल्सना फोन करून तसे स्पष्ट सांगितले पाहिजे. या संघर्ष विरामात अमेरिका कुठे होती, असा सवाल जेव्हा त्यांना करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की यूएसए वॉज इन युनायटेड स्टेट्स. ‘संघर्ष विरामात अन्य देशांची कोणतीही भूमिका नव्हती’, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. जयशंकर अनेक वर्षे अमेरिकेत भारताचे मुत्सद्दी म्हणून वावरलेले आहेत. त्यांच्या इतकी अमेरिका फार कमी जणांना ठाऊक आहे. परंतु जयशंकर ही काय चीज आहे, हे ट्रम्प यांनी पुरते ओळखलेले नाही.
ट्रम्प यांच्या चोंबडेपणाला भारताने जसेच्या तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तान जसा आपल्या पायाशी सरपटतो तसे भारतानेही करावे अशी अमेरिकेची इच्छा लपलेली नाही. सत्तेवर डेमोक्रॅट्स असो वा रिपब्लिकन, सगळ्यांची हिच इच्छा असते. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करणारी परराष्ट्र नीती राबवतोय आपला एजेंडा धाब्यावर बसवतोय हे अमेरिकेला सहन होत नाही. युक्रेन रशिया युद्धादरम्यान भारताने रशियाचा निषेध तर केलाच नाही, उलट त्यांच्याकडून तेल विकत घेणे सुरू ठेवले. अमेरीकेचा विरोध असताना त्यांच्याकडून आपण एस-४०० हे हवाई कवच विकत घेतले. त्यामुळे अमेरिकेला मिर्चा झोंबत होत्या. त्यात ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अमेरिकेची एफ-१६ ही विमाने पाडली, हा आणखी एक धक्का. संघर्ष विरामाचे श्रेयही ट्रम्प यांना घेऊन दिले नाही. एका बाजूला पाकिस्तान ट्वीट करून ट्रम्प यांचे आभार मानतो आणि दुसऱ्या बाजूला या युद्धविरामाशी ट्रम्प यांचा संबंध नाही, हे आपले परराष्ट्र मंत्री नेदरलँडच्या भूमीवरून स्पष्ट सांगतात हे अमेरिकेला कसे रुचेल?
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुद्धा आयएमएफने पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले. आयएमएफवर असलेला अमेरिकेचा पगडा सर्वश्रूत आहे. भविष्यात इराणशी संघर्ष झालाच तर पाकिस्तान नावाचे प्यादे आपल्या हातात असावे, म्हणून अमेरिकेची ही कसरत सुरू असते. पाकिस्तानशी आम्ही व्यापार वाढवू असेही ट्रम्प म्हणाले आहेत. गाजर दाखवण्याचे काम सुरूच आहे.
जेफ्री सॅक्स यांनी जे काही सांगितले त्यांची प्रचिती आता येऊ लागलेली आहे. जेव्हा पासून भारताने चीनसोबत वाटाघाटी करून एलएसीवरील विवाद संपवला तेव्हा पासून अमेरिकेची पोटदुखी वाढली आहे. जर अमेरिकेच्या नादाला लागून भारताने चीनसोबत संघर्ष ओढवून घेतला असता तर आज भारतासमोर अडचणींचा डोंगर उभा असता. ‘आपत्सू मित्रं जानीयात…’ असे एक संस्कृत सुभाषित आहे. मित्राची ओळख संकटात होते असा याचा अर्थ. भारत आपल्या तालावर नाचत नाही, म्हटल्यावर ट्रम्प यांनी भारताला चेपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयफोनची निर्मिती भारतात करू नका, अशी दमबाजी टीम कूक यांना करण्यात आली. कूक यांनी त्याला फार भीक घातली नाहीच शिवाय भारतात आणखी दीड अब्ज डॉलर्स गुतंवण्याची घोषणा केली. म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषेत कुक ट्रम्प यांना अरे हाड् म्हणाले. त्यामुळे तिरमिरलेल्या ट्रम्प यांनी एपलच्या उत्पादनांवर २५ टक्के टेरीफ लावण्याची धमकी दिलेली आहे. ‘थ्री इडीयट’ मधला जो डायलॉग आहे, ‘दोस्त फेल हो जाये तो दुख होता है, लेकीन दोस्त फर्स्ट आ जाये तो ज्यादा दुख होता है.’ ट्रम्प काय किंवा अमेरिका काय, त्यांची अडचण हीच झालेली आहे. भारत स्वत:च्या शर्तीवर पुढे जातो आहे, हे त्यांना खटकते आहे.
युक्रेन रशिया संघर्षा दरम्यान भारत रशियाच्या विरोधात उभा राहावा असे सगळे प्रयत्न अमेरिकेने केले. चीन आणि भारतात संघर्ष पेटावा असेही त्यांचे प्रयत्न होते. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ‘क्वाड’ हा ‘नाटो’ नाही हे २०२१ मध्ये स्पष्ट केले होते. ‘क्वाड’ (क्वाड्रीलॅटरल सेक्युरीटी डायलॉग) हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार देशांचा समुह आहे. ‘नाटो’ अर्थात (नॉर्थ अटलांटीक ट्रीटी नेशन्स) हा समुह रशियाच्या विरोधातील देशांचा आहे. तसा ‘क्वाड’ हा चीनच्या विरोधात नाही, असे जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्हाला चीनच्या विरोधात कोणतीही गटबाजी करण्याची इच्छा नाही, हे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अमेरिकेला सुनावले होते. त्यामुळे जेफ्री सॅक्स जे काही सांगतायत ते भारत आधी पासून करतो आहे.
हे ही वाचा..
आयएसआयच्या संपर्कात असलेल्याला कच्छमधून ठोकल्या बेड्या
गुजरातमधील बनासकांठामध्ये पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या
१० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा झारखंडमध्ये खात्मा
चीन हा अमेरिकेचा स्पर्धक आहे. महासत्ता होण्याच्या स्पर्धेत तो उतरला आहे. त्यांचे बसके नाक ठेचण्यासाठी अमेरिकेला भारत हवा हवासा वाटतो. परंतु भारत अमेरिकेच्या नादाला लागून वाट्टेल ते करणार नाही, हे भारताने अनेकदा आपल्या कृतीतून स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांचा उल्लेख कायम माय फ्रेण्ड ट्रम्प असा करतात. परंतु मित्र म्हटलंय म्हणून वाट्टेल ते सहन करणार नाही, हे भारताने सातत्याने दाखवून दिलेले आहे. जेफ्री यांचा सल्ला आणि भारताची नीती वेगळी नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
