शिंदे शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या पुरस्कारावरून सध्या राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल (११ फेब्रुवारी) दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. यावरून उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणे टाळायला हवे होते, असे राऊत म्हणाले. याच दरम्यान, ‘पवारांची भूमिका पटली नाही तर संजय राऊत यांनी मविआतून बाहेर पडावे,’ असे आव्हान शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई यांनी राऊतांना केले आहे.
शंभूराजे देसाई म्हणाले, शरद पवार यांची भूमिका पटली नाही तर संजय राऊतांनी मविआमधून बाहेर पडावे. मविआतून बाहेर पडल्यावर यांची अवस्था काय हे त्यांनी बघावे. नुसत्या तोंडाच्या वाफा घालवत बोलत बसू नका तसे करून दाखवा. पवारांची भूमिका नाही पटली तर व्हा बाजूला, तुमच्यामध्ये धाडस आहे का बघू?. ते पुढे म्हणाले, संजय राऊत बाजूला सरणार नाहीत, केवळ बोलून महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घ्यायचे काम करत आहेत.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ला होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला चेंबूरमधून अटक
एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर राऊत संतापले
भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स
राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन
आमदार रोहित पवार यांनीही राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचे रोहित पवार म्हणाले. ट्वीटकरत ते म्हणाले, दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे.
महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी!