श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी म्हेत्रे यांच्यात कधीही श्रीमंतीचा दर्प आला नाही. त्यांच्यात अहंकार आला नाही, ते कायम जमिनीवर राहिले तर अनेक लोक वडिलांच्या नावावर बढाया मारतात, फुशारक्या मारतात, असा सणसणीत टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी आज (६ जून) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे इथलं मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पक्ष पाहिला नाही, आलेल्या माणसाचे काम केले. त्यामुळे इथल्या हिंदु मुस्लिम बांधवांचा म्हेत्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे. श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी यांच्यात कधीही अहंकार आला नाही. अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात, मात्र सिध्दारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत, ते कायम जमीनीवर राहिले. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आज सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत. त्यांच्या नावात राम आहे. ते शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा :
राज-उद्धव युतीशी माझा संबंध नाही! तेच प्रतिक्रिया देतील
शर्मिष्ठा पानोली आणि खदिजा शेख प्रकरणात न्यायालयांचा कोणता दृष्टिकोन योग्य?
मिशेल स्टार्कने आयपीएल २०२५ मधून बाहेर राहण्याचे केले समर्थन
घुसखोरांना अभय देण्यासाठी डाव्या परिसंस्थांची तडफड
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली आणि राज्याने एक मोठा उठाव पाहिला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचलले. केवळ भारताच नव्हे तर जगातील ३३ देशांनी या उठावाची दखल घेतली. जनतेनेही या उठावाला प्रतिसाद दिला. आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील. आधीचे सरकार स्थगिती सरकार होते आताचे सरकार प्रगतीचे सरकार आहे.
सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचे काम आम्ही करतोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक यानुसार काम करायचे आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
