छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती किल्ले शिवनेरीवर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. शिवभक्तांनी यावेळी मोठी गर्दी किल्ल्यावर केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजपासून पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा ४०० वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. शिवनेरीवर आल्यावर आपल्याला जी स्वराज्याची स्फूर्ती मिळते ते घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व लोक येथे येत असतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हातात तलवार घेऊन अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र केले. मावळ्यांची फौज तयार करून देव, देश आणि धर्माची लढाई सुरू केली. खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्मभिमान जागरूत करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले, असं फडणवीस यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक होते. पर्यावरण, जलसंवर्धन, जंगलसंवर्धन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाचे गुरू छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळेचं ते आदर्श राजे होते आणि आपण त्यांना जाणता आणि श्रीमंतयोगी राजे म्हणतो. आम्ही त्यांच्या सर्व किल्ल्यांचा विकास करू. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. “छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. स्वराज्याची राजधानी रायगड येथे अनेक कामे आपण सुरू केली आहेत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
काँग्रेसशासित हिमाचलमध्ये मशिदीसमोर उभारलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीत, तर आराध्य देव आहेत!
छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकुराबद्दल विकिपीडियाला पोलिसांची नोटीस
अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा
“युनेस्कोमध्ये जगातील वारसास्थळे नेमण्यात येतात. यात भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले नामंकित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले स्थापत्य शास्त्र, जलसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचे उत्तम नमुना असून याची मांडणी पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये युनेस्कोच्या महासभेसमोर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे किल्ले जागतिक वारसा होतील,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.